Bahujan parv

उष्णता आणि प्रदूषणामुळे दमा आणि त्वचारोगांचा वाढतो धोका; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Spread the love

Health Tips : सध्या वाढत्या उष्णतेसह शहरांमध्ये वाढणारे वायुप्रदूषणही नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, उष्ण हवामान आणि प्रदूषण यांचा एकत्रित परिणाम श्वसनविकारांसोबतच त्वचारोगांनाही कारणीभूत ठरत आहे. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध आणि आधीपासून अॅलर्जी किंवा दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींना याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. गरम हवा आणि प्रदूषणातील सूक्ष्म कण (Particulate Matter) फुफ्फुसांमध्ये जळजळ निर्माण करतात, ज्यामुळे दमा, खोकला, छातीत घरघर होणे आणि दम लागणे यांसारखी लक्षणं दिसून येतात.

दमा असलेल्या रुग्णांमध्ये ‘ही’ लक्षणं दिसतात

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हवेत असलेले सूक्ष्म धूलिकण (PM2.5), धूर, रासायनिक घटक आणि वाहनांमधून निघणारे वायू हे श्वसनमार्गाच्या समस्येस आमंत्रण देतात. यामुळे दमा असलेल्या रुग्णांमध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे , छातीत जडपणा अशा लक्षणांमध्ये वाढ दिसून येते. उष्णतेमुळे हवेत ओलावा आणि प्रदूषकांचे प्रमाण वाढल्याने हा त्रास अधिक तीव्र होऊ शकतो.

प्रदूषणाचा परिणाम एखाद्याच्या त्वचेवरही होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे, त्यामुळे घरातील वातावर थंड राखण्यासाठी एसी, कुलरचा आधार घेतला जातो. मातेर अशावेळी बाहेरच्या आणि घराच्या आतील वातावरणातील झालेल्या बदलांमुळे जंतुसंसर्गाचा त्रास वाढत जातो. हवेत असलेले विषारी कण त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये जाऊन अडथळा निर्माण करतात. यामुळे मुरुम येणे, त्वचेवर रॅशेस येणे, त्वचेची जळजळ वाढणे, खाज येणे आणि अॅलर्जीसारखे त्रास वाढू शकतात. उष्णतेमुळे घामाचे प्रमाण वाढते, आणि त्यात प्रदूषणामुळे त्वचेवर बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता अधिक असते. उष्णता, घाम आणि धुळीमुळे नायटा, गजकर्ण, त्वचेची ऍलर्जी, पुरळ उठणे आणि खाज सुटणे या समस्या वाढतात. अति उष्णतेमुळे देखील त्वचा कोरडी पडते आणि त्वचेची जळजळ होते.

विशेषतः शहरी भागांमध्ये राहणाऱ्या लोकांनी याबाबत अधिक सतर्क असणे गरजेचे आहे. दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळावे, आवश्यक असल्यास मास्कचा वापर करावा, तसेच घरी आल्यावर चेहरा आणि हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी हलक्या, नॉन-ऑइली मॉइश्चरायझरचा वापर करणे आणि भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.

दम्याची महत्त्वाची कारणं

दमा म्हणजे श्वसनमार्गास सूज येऊन ते अरुंद होणे, विविध पर्यावरणीय घटकांमुळे दम्याचा त्रास वाढू शकतो, ज्यामध्ये उन्हाळ्यातील उष्णता आणि ऍलर्जी ही महत्त्वाची कारणं आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दम्याच्या रुग्णांनी नियमित औषधांचे सेवन करणे घेणे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचारात बदल न करणे गरजेचे आहे. घरात एअर प्युरिफायरचा वापर करणे, झाडं लावणे आणि घर स्वच्छ ठेवणे यामुळे प्रदूषणाचा परिणाम कमी करता येऊ शकतो.

एकूणच, उष्णता आणि प्रदूषण हे एकत्रितपणे आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. त्यामुळे योग्य प्रतिबंधक उपाययोजना आणि वेळोवेळी काळजी घेतल्यास दमा आणि त्वचारोगांचा धोका कमी करता येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *